ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करा : कार्यकर्त्यांची मागणी

Foto
भोपाळ: राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षाची अद्याप निवड करण्यात आलेली नाही. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करावी, अशी मागणी करणारे पोस्टर्स मध्य प्रदेशात लागले आहेत. राहुल गांधी यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पोस्टर्समध्ये म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी घराण्याबाहेरची व्यक्‍ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी असली पाहिजे, असे  मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी विनंती करूनही राहुल गांधी  राजीनाम्यावर ठाम राहिले. आता राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिले जाणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या वातावरणात मोतीलाल व्होरा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली जातील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी स्वतःच ही चर्चा फेटाळून लावली आहे. आता भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावत ज्योतिरादित्य सिधिंया यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करावी, अशी मागणी केली आहे.